Saturday, July 12, 2014

जीवन घडविणारे गुरु!


एके दिवशी सदाशिव पेठेतून चाललो होतो, स्त्याच्या बाजूला एका आकर्षक व्यक्तिमत्वाने माझे लक्ष वेधले. पांढरी शुभ्र दाढी, भारतीय पेहराव व डोक्याभोवती पांढरे कापड गुंडाळलेले होते. मी त्यांचा फोटो कुठेतरी पाहिलेला होता. मी चटकन पुढे झालो आणि त्यांना विचारले? आपण डॉ. विनोद का? ते म्हणाले, हो. मी पटकन त्यांना नमस्कार केला, त्यांची योगावरील काही पुस्तके मी वाचलेली होती. त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाले ये ना. आम्ही त्यानंतर बराच वेळ चर्चा केली. माझा योग शास्त्राविषयीचा थोडा फार अभ्यास होता. बोलताना मी योगात करिअर करणार असल्याचे त्यांना सांगितले, व आपण मार्गदर्शन करा अशी विनंती केली.
त्यांनी होकार दर्शविला, व म्हणाले कि तू माझ्या घरीच रहायला ये, येथेच साधना कर आणि अभ्यासहि चालू ठेव. मला त्यांचा सल्ला पटला पण, मनात शंकाही आली कि पहिल्या भेटीतच हे इतके चांगले कसे काय वागत आहेत?
त्यानंतर काही दिवसांनी मी त्यांच्याकडे राहायला गेलो, योगसाधना सुरु केली. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप वेगळी होती, अतिशय शांतपणे, हळुवार व सहज योगासने करायला त्यांनी शिकवले, त्या अगोदर अशा पद्धतीने मी कधीही योग केलेला नव्हता. योगाबरोबरच त्यांनी मला शिक्षण चालू ठेवण्यासाठी प्रवृत्त केले. मी साधारण पाच वर्ष त्यांच्या घरी राहिलो. त्या कालावधीत मला समजले कि, माझ्याप्रमाणेच त्यांनी अशा पद्धतीने अनेक ग्रामीण भागातील मुलांना शिकविले आहे, त्यांचे जीवन घडविले आहे. प्रचंड यशस्वी व सुखी समाधानी जीवन ते सर्वजण जगत आहेत. मला पहिल्यांदा खूप आश्चर्य वाटायचे, कि हे लोक इतके शांत कसे राहू शकतात, कायम आनंदी कसे दिसतात. कधी कधी तर असेही वाटायचे कि हे सर्व जन दिखावा तर करत नाही ना? मी काही जणांना विचारायचो सुद्धा, कि कसे करता हे सर्व? खूप दिवसानंतर मला जाणवले कि या सर्व गोष्ठी आपोआप घडत असतात, योग साधनेचा तो परिणाम असतो.
अनेक वर्ष साधना केल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी दोन वर्ष देशसेवेसाठी दिली, मोटार सायकल वरून चार महिने संपूर्ण भारत भ्रमण केले, व भारतातील अनेक मोठमोठ्या व्यक्तींना भेटलो.
एका कंपनीत नोकरी करणारा मी एक साधारण व्यक्ती होतो. व्यवसाय, उद्योगधंदे याविषयी काहीही माहिती नव्हते. घरी शेती होती, आर्थिक पाठबळ नव्हते. पण एकदा मानसिक पातळीवर आपण सशक्त झालो कि जीवनात ठरवू ते करू शकतो याचा अनुभव मी सध्या घेत आहे.
चार वर्षापूर्वी मी स्वतंत्र व्यवसाय सुरु केला, व सध्या एक यशस्वी, समाधानी व आनंदी उद्योजक असल्याचा मला अभिमान आहे

No comments:

Post a Comment